आटकांचे दिवस !

◾आटकांचे दिवस !😍
                 काळाबरोबर अनेक गोष्टी बदलत जातात. हे बदल अपेक्षित नसले, तरी स्वीकारावेच लागतात. बदलत नाहीत, त्या आपल्या अंतर्ममनात खोलवर रुतून बसलेल्या आठवणी ! बदलत्या काळात सर्व परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत अंतर्ममानातील या आठवणीच देत असतात. अनेकदा आपल्या मनातील या आठवणी नेत्र कडा पाणवण्या एवढ्या गहिऱ्या बनतात. यानंतर आपलं मन मोकळं होतं आणि एका नव्या उत्साहानं मार्गक्रमण करू लागतं. आठवणींशिवाय आयुष्य रीतं आहे, याची आपल्याला जाणीव होऊ लागते. बालपणी शाळेत अथवा मैदानावर विविध प्रकारचे खेळ खेळत असताना परस्परात घडणारे संवाद म्हणजे नातं दृढ करणारे रेशीम धागेच होते. रेशमाच्या या नाजूक धाग्यांनी परस्परांची मनं बांधून ठेवली गेली . रेशमाच्या या धाग्याला भेदभावाची ओळख नव्हती, स्वार्थाचा लवलेशही नव्हता, होती ती फक्त आपुलकी आणि प्रेम जिव्हाळा ! ती मैत्री बंधू भावाची होती. परस्परातील मैत्री कायम निभावणं, या भावबंधनाची होती. या सगळ्या मागे उभे होते, ते घरचे भक्कम संस्कार. बालपणी ज्यांनी गरिबी अनुभवली, ते मनाने श्रीमंत झाले. मनाच्या श्रीमंतीने अनेकांना आपलेसे केले. यातूनच तयार झालं नात्यांचं एक भव्य भावविश्व ! लिमलेटची एक गोळी शर्टाच्या टोकात धरत, त्याचे तीन तुकडे करुन ज्यांनी खाल्ली आहे, त्यांना आयुष्याची गोडी कळलीय. एक कैरी दगडाने ठेचून, त्याचे झालेले सर्व भाग ज्यांनी वाटून खाल्लेत त्यांना आंबट- गोड जीवनाचे रहस्य उलगडलेय. या वृत्तीतून बालपणी मुलांवर उत्तम संस्कार झाले, ते उपलब्ध असलेली वस्तू एकमेकात समान वाटून घेण्याचे. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्वासमवेत वाटून खाणे म्हणजेच सहकार ! पूर्वी रानावनात उपलब्ध असणारा कोकणचा रानमेवा हाच आमचा खाऊ होता. शाळेत जाताना खाऊ साठी पैसे मिळणे हे स्वप्नवत होते. परिणामी निसर्गाकडून जे मिळेल ते आनंदाने घ्यायचे, हाच आमचा खाऊ ! हंगामा नुसार येणारा सर्व प्रकारचा रान मेवा आम्हाला बालपणी उत्तम पद्धतीने ज्ञात झाला होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पिकणाऱ्या आंबट गोड आणि लाल चुटुक आटकांनी आमच्या रसनेला बालपणी कमालीचा आनंद दिला. आटकांच्या हंगामातील ते दिवस, आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले.

                   ऐतिहासिक म्हणून ओळख असलेल्या कसबा या गावात व्यतीत झालेले आमचे बालपण अनेक अविस्मरणीय आठवणींनी समृद्ध बनले. आपल्या जीवनात समृद्धी अगदी सहजपणे येत नाही. समृद्धी येण्यासाठी आपले विचार समृद्ध असावे लागतात. आमच्या बालपणी आम्हाला लाभलेले सर्व सवंगडी समृद्ध विचाराचे होते. याच्या जोडीला आमच्यावर घरातून होणारे संस्कार आमच्या समृद्धीत अधिक भर घालत. परस्परातील संवादामुळे जे काही करायचे ते एकमताने आणि एकजुटीने. बालपणातील आमच्या सवंगड्यानी कधीही कोणाला अंतर दिले नाही. सारे सवंगडी जीवाला जीव देणारे होते, असं म्हटलं तरीही त्यात काहीच गैर नाही. साजरे करायचे सण उत्सव, मैदानावरील विविध खेळ, शाळेत जाणे येणे, अभ्यासाला बसणे, रानमेवा खाणे, नदीवर पोहायला जाणे, सायकल चालवणे अशा प्रत्येक प्रसंगी आमचा चमू एकत्रच असे. या एकीची ताकद आम्हा सगळ्यांना कळलेली होती. कसबा गावातही आमच्या या चमुची एक वेगळी ओळख होती. आमच्या समूहात एखादा जरी सवंगडी कमी असेल, तर त्याची गावकऱ्यांकडून चौकशी केली जायची. शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कर्णेश्वर मंदिराच्या जवळच आम्ही राहत असल्याने, यासह आजूबाजूच्या मंदिरात आमचे दररोज जाणे येणे असे. ही मंदिरे म्हणजे आमच्या नित्य भेटीचीच ठिकाणं होती. कर्णेश्वर मंदिराच्या परिसरात खूप मोकळा भाग असल्याने येथे आमचे विविध खेळ रंगत असत. 

                    कर्णेश्वर मंदिराकडे जाताना वाटेतच “ होळी खुंट ” हे ठिकाण आहे. शिमगोत्सवात या ठिकाणी होळी उभी केली जाते. या होळी खुंटा लगतच एक ‘ आटकं ’ या फळाचं झाड होतं. हे झाड म्हणजे सुद्धा आमचा एक विश्वासू सवंगडीच होता. येण्या - जाण्याच्या मार्गावर हे झाड असल्याने आमचं त्याच्याकडे नेहमीच लक्ष जायचं. सध्याच्या काळात आटकं म्हणजे काय ? हे सांगावंच लागेल. करवंदा प्रमाणे चवीला आंबट गोड असणार आणि त्यापेक्षा आकारानं थोडं मोठं असणार हे फळ,  सुरुवातीला कच्च असताना हिरव्या रंगाचं आणि पिकल्यानंतर लाल चुटूक रंगात बदलून सर्वांना आकर्षित करायचं . करवंदाच्या जाळ्या असतात मात्र आटकं, याचं एक मोठं झाड असतं. आटकाला जानेवारी महिन्यात तुरा येऊन फेब्रुवारी अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला याची फळं पिकू लागतात. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने आमच्यासाठी पर्वणीचेच ठरत. शाळेतून आल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी आमचा बराचसा वेळ या आटकाच्या झाडाच्या जवळपास जात असे. पूर्वी शाळेत जाणाऱ्या मुलांना खाऊ साठी पैसे देण्याची पद्धत नव्हती. असे पैसे देणं घरच्या शिस्तीत बसणार नव्हतं आणि पालकांना परवडणारंही नव्हतं. अशा काळात एखादी लिमलेटची वा पेपरमीटची गोळी अथवा रावळगावचं चॉकलेट शर्टाच्या टोकात धरून दाताखाली चावायचं आणि जेवढे तुकडे होतील, तेवढे एकमेकात वाटून घ्यायचे यातच खरा आनंद होता. यामधून आपल्याकडे जे काही असेल, ते दुसऱ्याला देण्याचे संस्कार तर झालेच शिवाय परस्परातील नातं अधिक दृढं झालं. लिमलेटच्या गोळीची अथवा रावळगावच्या चॉकलेटची संधी क्वचितच कधीतरी मिळे. अन्य वेळी आम्हाला खरा आधार होता, तो निसर्गातील रानमेव्याचाच ! कसबा गावात बालपणी आम्ही खाल्लेली आटकं म्हणजे जीवनातील आंबट गोड आठवणींचा एक खजिनाच म्हटली पाहिजेत. आटकांचे ते दिवस आजही आठवले, की रसनेवर आंबट गोड चवीचे स्पर्श आपोआप होऊ लागतात. आटकांचे ते दिवस, म्हणूनच अविस्मरणीय बनून आमच्या अंतर्मनात आजही कायम आहेत. 

                      फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान कधीतरी एक दिवस कर्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होतो. हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी त्याकाळी जवळपास दहा दिवसांची एक आनंददायी मेजवानीच असे. उत्सवाच्या आधी आणि नंतर आमचा बराचसा वेळ हा कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातच जात असे. महाशिवरात्री दरम्यान आटकं पिकावी म्हणून आम्ही देवाजवळ प्रार्थना करायचो. महाशिवरात्रीच्या दिवशी ठीक ठिकाणाहून विविध व्यावसायिक कर्णेश्वर मंदिराच्या परिसरात येऊन आपली दुकान मांडत असत. याचवेळी आपण ‘आटकं ’ विक्री करायची असं आमच्या सवंगड्यात ठरलेलं असे. आम्ही सारे सवंगडी महाशिवरात्रीच्या दिवशी असं काही दुकान लावणार आहोत, याची घरी कोणतीही कल्पना नसे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी आमचा सात-आठ मुलांचा समूह एकत्र यायचा . यातील कोणी ना कोणी झाडावर उत्तम चढणारा असे. त्याच्याकडून काही प्रमाणात सुटी आणि काही फांदीसह आटकं काढून घेऊन, ती आम्ही कोणाच्यातरी घरी सुरक्षित ठेवायचो. कधी एकदा महाशिवरात्रीचा दिवस उजाडतोय आणि आम्ही आपलं दुकान लावतोय, असं आम्हाला वाटत असे. अधिकाधिक लोकांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर आम्ही ही आटकं विक्रीसाठी घेऊन बसायचो. खरंतर स्थानिक आणि आजूबाजूच्या लोकांना यां आटकांचे अप्रूप ते काय असणार ? हे आमच्या कधी लक्षातच आले नाही. मात्र मुलांनी दुकान लावलं आहे, म्हणून काही मंडळी आमच्याकडून ही आटकं विकत घेत असत. मधूनच यातील काही आटकं खाऊन आम्ही आमचंही पोट भरून घ्यायचो. सायंकाळी आटकं विक्रीतून जे काही पैसे जमा झाले असतील, त्याचा अन्य दुकानात जाऊन आम्ही सर्वांसाठी खाऊ घेऊन, तो वाटून घ्यायचो .  आपण आपल्याच मेहनतीतून चार पैसे कमवत विकत घेतलेल्या खाऊची चव आम्हाला अधिक गोडी आणि आनंद मिळवून द्यायची. 

  
               महाशिवरात्रीत दुकान लावून विकण्यासाठी काढलेली आटकं जर शिल्लक राहिली, तर आम्ही ती ओळखीच्या लोकांना घरी नेऊन द्यायचो. अचानक आटकं मिळाल्यामुळे त्या घरातून आमच्या हातावर एखाद दुसरे बिस्किट किंवा गोड पदार्थ घातला जायचा आणि शाबासकीही मिळायची . या आंबट गोड आटकांनी आम्हाला अनेकदा सुखद आनंदाच दिला. अधून मधून ही आटकं आम्ही शाळेत नेऊन आमच्या सवंगड्यांना देखील देत होतो. आटकं मिळाल्यानंतर आमच्या मित्रमंडळींच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद पाहून आम्हाला कमालीचं समाधान मिळे. फुलोऱ्यातून आटकं आकार घेऊ लागली, की ती हिरव्या करवंदा सारखी दिसतात. झाडावर आटकं दिसू लागल्यानंतर आमचं मन ती खाण्यासाठी अस्वस्थ होई. कधीतरी एखाद्या मित्राला आटकाच्या झाडावर चढवून आंबटढाण असलेली आटकं आम्ही डोळे बारीक करुन खायचो. याचा आंबटपणा थोडा कमी व्हावा म्हणून आम्ही त्यात मीठ आणि लाल तिखट मिसळायचो. आंबट आटकांचे हे एकत्रित मिश्रण फारच सुरेख लागे. आटकं पिकल्यानंतर त्याच्यात गोडी निर्माण होत असल्याने आम्ही कच्ची आटकं फार काढत नव्हतो. आटकाचे हे झाड जोशी यांच्या मालकीचे असले, तरी त्यावर फळं धरल्यानंतर त्या झाडाची मालकी आम्हा मुलांकडे येत असे. आमच्या शिवाय अन्य कोणी या झाडावर चढून आटकं काढत नसे. याचा मुख्य कारण म्हणजे फळं धरल्यानंतर कायमच आमचा वावर लक्ष ठेवण्याच्या निमित्ताने या झाडाच्या आजूबाजूला असे. गावातील कोणाला आटकं खावीशी वाटली, तर ते आमच्याकडे पाहून म्हणत, “ मुलांनो आटकं काढाल त्यावेळी थोडी मला आणून द्या रे! ” 

                 आटकाचे दुसरं झाड कसबा गावातील नृसिंह मंदिरा जवळ अगदी नदी लागत होतं. या झाडाला पूर्वीपासून एक जांभ्या दगडाचा चौकोनी पार केलेला होता. हे झाड चढायला थोडं अवघड असलं, तरी याच झाडाची आटकं आकाराने मोठी आणि अवीट चवीची होती. नदीलगत असणाऱ्या या झाडाकडे सायंकाळनंतर आम्हाला जाण्याची परवानगी नव्हती. नदीकडचा भाग निर्मनुष्य असल्याने येथील वातावरण काहीसे गुढ वाटायचे. झाडावर चढणारा एखादा कसबी माणूस बघून आम्ही त्याला आटकं काढून देण्यासाठी मिनतवाऱ्या करायचो. पहिल्याच प्रयत्नात या झाडाची आटकं खाण्याचे आमचे स्वप्न कधीही साकार झाले नाही. चार-पाच वेळा विनंती केल्यानंतर आमच्या पदरात या झाडाची आटकं पडत. झाड चढण्यास कितीही कठीण असले, हा भाग निर्मनुष्य आणि काहीसा गुढ असला, तरी आमची याच झाडावरील आटकं खाण्याची जिद्द कायम असे. विशेष म्हणजे कसबा गावातील या दोन आटकाच्या झाडांव्यतिरिक्त आम्ही अन्य झाडांची आटकं कधी खाल्ल्याचे मला स्मरत नाही. विशेष म्हणजे आमच्या आंबेडखुर्द या गावी सर्व प्रकारची झाडं असताना, आटकाचं झाड मला कधीही आमच्या जागेत वा परिसरात पाहायला मिळालं नाही. कदाचित म्हणूनच कसबा गावातील आमचे आटकांचे दिवस अविस्मरणीय ठरले. मानवी स्वभावाचे देखील यां आटकां सारखेच असते. प्रथम तुरट, आंबट आणि नंतर गोड ! माणूस जसा अनुभवाने समृद्ध होत जातो, तसा त्याच्या स्वभावात बदल घडत जातो. 

                   आटकांचा हंगाम संपत आल्यानंतर आमचा मोर्चा वळायचा तो, गानू आजींच्या घराजवळ असणाऱ्या दोन पेरुच्या झाडांकडे. ही झाडे आम्हा मुलांना चढण्यास सहज सोपी असल्याने आमच्यापैकी कोणीही पेरु काढू शकत होते. पेरूचा हंगाम संपत आल्यानंतर अळू आणि करवंद हा रानमेवा आमची जणू वाट पाहत असायचा. कोकण आणि रानमेवा हे एक अतूट नाते आहे . करवंदीच्या हिरव्या जाळ्या पांढऱ्या फुलांनी बहरल्या की , प्रथम त्या फुलांचा गंध एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो . ही कोवळी फुले खायला देखील खूप मज्जा येते . फुलांनी बहरलेल्या जाळ्या सृष्टीचे सौंदर्य वाढवत असतात . या फुलांची हिरवी करवंदे कधी तयार होणार ?  याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते . छोटी छोटी हिरवी करवंदे कितीही आंबट असली तरीही एक डोळा बारीक करुन आणि तोंड वाकडे करुन त्याची चव चाखण्याची मज्जा काही औरच . हिरव्या करवंदांची चटणीही चवदार असते . करवंदे पिकली की , स्वतःच्या हाताना काढून एखाद दुसरा काटा हाताला लागल्यानंतरच ती खाण्यात खरा आनंद . मे महिन्याच्या सुट्टीत गावी येणाऱ्या सर्वांना घेऊन डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळ्या धुंडाळणे म्हणजे एकत्र रानमेवा चाखण्याची खरी पूर्वापार पध्दत . कालौघात हे सारे रानमेव्या सारखेच दुर्मीळ झालेय . याच हंगामात येणारे भरपूर लोह देणारे फळ म्हणजे अळू ! हे अळू म्हणजे मोठ्या पानांचे अळूवडीचे नव्हे बरं . कॅडबरीच्या रंगाचे टोमॅटोच्या आकाराचे एक अवीट चवीचे फळ . 

                  ' रानमेवा ' हाच ग्रामीण भागातील आम्हा सवंगड्यांचा आवडीचा खाऊ होता . यामध्ये अळू हे फळ याच हंगामात येणारे . अळूची झाडे तशी मोजकीच असल्याने हा सहज सर्वत्र उपलब्ध होत नाही . याची मुद्दामहून कोणी लागवडही करत नाही . मात्र ज्याला जे आवडते ते , कोठे मिळू शकेल ? याचा शोध बालपणी आवर्जून घेतला जायचा . कसबा गावातील  ' राऊत ' नावाच्या आज्जींनी आईकडे एकदा हिरवे चार अळू आणून दिले . आमच्या आईला हे अळू पिकविण्याची प्रक्रिया माहित असल्याने तीने ते पिकण्यासाठी चक्क राखेत घालून ठेवले . फळ पिकविण्याची ही प्रक्रिया आम्हाला एकदमच नवीन होती . हिरवेगार असणारे अळू चार पाच दिवसात गडद चॉकलेटी रंगाचे झाले . निसर्गाची ही जादू पाहून थक्क व्हायला नाही झालं तरच नवल ! आईने अळू फोडून त्याचे बारीक निरीक्षण केले आणि अर्धा अळू आमच्या हातात दिला . एखादी माहित नसलेली वस्तू हातात पडली की , त्याची चव घेण्याआधी गंध घेण्याचा मानवी स्वभाव आमच्यातही असल्याने भावाने आणि प्रथम पिकलेल्या अळूचा गंध घ्यायचा प्रयत्न केला . मात्र हा वास फारसा चांगला नसल्याने आम्ही अळू खायचा की नाही ? म्हणून एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहात बसलो . मात्र त्यानंतर आम्ही दोघांनीही अळूची फोड जीभेवर ठेवली . आंबटगोड चवीचा तो अळू म्हणजे , लाजवाबच ! आम्हांला दोघां भावांना अळू एवढा आवडला की , चार पैकी तीन अळू आम्ही दोघांनीच फस्त केले . अळू कोणी आणून दिले ? याची चौकशी झाल्यानंतर राऊत आज्जींच्या घरी कसे जायचे वगैरे माहिती आम्ही काढून ठेवली . एक दिवस दोघांनी शाळा सुटल्यानंतर राऊत आज्जींचे घर गाठले आणि अळू काढू का ? असे विचारताच , प्रेमळ आवाजात मिळालेली परवानगी अळूच्या चवी इतकाच आनंद देवून गेली . झाडावर चढताना खूपच काळजीपूर्वक चढावे लागले. या झाडाला लांब आकाराचे काटे असतात. या काट्यांना चुकवत आम्ही सात आठ अळू काढून घर गाठले आणि पिकवायची प्रक्रिया माहिती झालेली असल्याने अळूच्या चवीचा मनमुराद आनंद लुटला . त्यानंतर प्रत्येक वर्षी आटकांच्या पाठोपाठ पेरु, अळूची अवीट चव कधीही चुकली नाही . 

                 
                     भरपूर लोह देणारे अळूचे हे फळ आंबटगोड असले , तरी यातील आंबटपणा न जाणवणाराच असतो . आतमध्ये मध्यभागी मोठ्या बीया असतात . त्या काढल्या की , सर्व भाग खाण्यायोग्यच असतो . या फळाबद्दल सर्वांनाच माहिती असेल असे नाही . निसर्गाने रानमेव्याच्या माध्यमातून मानवाला खूप काही दिले आहे . अजूनही काही रानमेव्या बाबत बरीचशी मंडळी अनभिज्ञ असल्याने निसर्गा जवळ मैत्री करुन आणि याबाबतची माहिती घेऊन रानमेवा चाखला पाहिजे . बालपणी अळूची लागलेली गोडी आजही कायम असल्याने मे महिन्याच्या हंगामात चार पाच अळू पैदा करुन त्याची अवीट गोडी चाखण्याचा नेम मी अजूनही सुरु ठेवलाय . आटकांच्या बाबतीत मात्र आम्ही कसबा गाव सोडल्यानंतर याची चव घेण्यात कायमचा खंड पडला. नंतर आटकाची झाडं कुठे आढळली नाहीत अथवा ती विक्रीसाठी बाजारपेठेत आल्याचं पाहायलाही मिळालं नाही. आटकं हे तसं दुर्लक्षित फळ. पूर्वी खाऊचे प्रकार नसल्याने आणि तो घेण्यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याने आम्हाला ही आटकंच आमचा खाऊ वाटायची. बालपणी या आटकांनी आमच्या जीवनात आंबट गोड पणा भरून खरी लज्जत आणली. आटकं मिळवण्यासाठी त्यावेळी केलेल्या प्रयत्नामुळे आटकांचे ते दिवस अविस्मरणीय ठरले. आता तर कसबा गावातील आटकाची ती दोन झाडं जागेवर उभी असतील कां ? याची देखील कल्पना नाही. ही झाडं उभी असलीच, तर त्यावरील आटकं खरंच कोणी काढत असेल कां ? हे देखील सांगता येत नाही. कारण बदलत्या काळात आता फळांचे आणि खाऊचे मुबलक प्रकार उपलब्ध आहेत आणि घरातून मुलांना खाऊ साठी सढळ हस्ते पैसाही दिला जात आहे. कदाचित यामुळेच ही आटकं झाडावरच पिकून जमिनीवर गळून पडत असतील. एकेकाळी हे झाड बहरल्यानंतर त्याच्या आजूबाजूला वावरणारा मुलांचा घोळका, ही या झाडाची खरी श्रीमंती होती. आता मात्र ती दोन्ही झाडं जागेवर उभी असली , तर नक्कीच एकाकी पडली असतील. कालायं तस्मै नमः ! आटकांचे ते दिवस सोनेरी होते, म्हणूनच त्याची गोडी हळूहळू प्रथम आमच्या शब्दात उतरली आणि नंतर वाचकांच्या मनावर रुंजी घालू शकली. 

jdparadkar@gmail.com
Jitendra Paradkar 

वरात

◾वरात!!
              वरात ! हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते, ती विवाह झाल्यानंतर नवरदेवाची काढली जाणारी मिरवणूक. यालाच वरात असे म्हटले जाते. फार पूर्वीपासून विवाह नंतर नवरदेवाची वरात काढण्याची प्रथा सुरू आहे. सध्याच्या काळात त्याचे रूप काहीसे बदलले असले, तरी त्या मागची भावना मात्र आजही कायम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या वरातीचं स्थान वेगवेगळं आहे. याबरोबरच प्रत्येकाच्या वरातीबाबतच्या आठवणी देखील अविस्मरणीय अशाच आहेत. वरात ही विवाहनंतर नवरदेवाचे काढली जाते, हे जरी खरं असलं तरी कोकणात व्रतबंध म्हणजेच मुंज या विधीनंतर देखील बटूची भिक्षावळ म्हणजे एक प्रकारची वराती सारखीच मिरवणूक काढण्याची पद्धत आजही सुरू आहे. एकंदरीत वरात ही का काढली जात असेल, अथवा त्यामागील खरा उद्देश काय असेल ? याबाबत विचार केला असता, शुभ कार्यानंतर परमेश्वराच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावणे आणि आनंद व्यक्त करणे अशी वरात काढण्या मागची खरी कारणं आहेत. पूर्वी ताशा या पारंपारिक वाद्याच्या तालावरच वरात काढली जात असे. आता मात्र कर्णकर्कश आवाजाच्या डीजे, बेंजो सारख्या वाद्याच्या तालावर वेळेचे भान न ठेवता वरातीचा कार्यक्रम संपन्न होताना दिसतो. पूर्वी वरात म्हणजे शुभ कार्यानंतर संपन्न होणारी एक प्रथा - परंपरा होती. बदलत्या काळात वरात म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. वरात ही विवाहानंतर वधू वराची काढली जात असली, तरी व्रतबंध, गावातील एखाद्या सार्वजनिक कार्यात मिळालेलं यश, अटीतटीच्या निवडणुकीनंतर मिळालेला विजय, राज्य राष्ट्रीय स्तरावर एखाद्या व्यक्तीला मिळालेलं यश अशाप्रसंगी काढली जाणारी आनंददायी मिरवणूक देखील गावची वरात म्हणूनच ओळखली जाते. वाद्य वाजवणारे वाजपी, गावातील प्रतिष्ठित माणसं, उत्सव मूर्ती, वराती मध्ये सहभागी असणाऱ्यांना आपल्या डोक्यावर गॅसबत्ती घेऊन उजेड दाखविणारे वाटाडे, फटाक्यांची आतिषबाजी करणारे कारागीर, नृत्य करणारे तरुण-तरुणी, उतार वयातही नृत्याचा आनंद लुटणारे आजी आजोबा, वरातीच्या प्रारंभीच उड्या मारणारी छोटी छोटी मुले असा सर्व समूह एकत्रित रित्या आनंद साजरा करीत मार्गक्रमण करत असतो, त्यालाच ‘ वरात ’ असे म्हटले गेले आहे. वराती मधील प्रत्येकाच्या आठवणी जरी भिन्न असल्या, तरी त्या आजही हृदयात घर करून आहेत.

                  वरात आणि ताशा यांचं एक अतूट असं नातं आहे. पूर्वीचे ताशे आणि सध्या उपलब्ध असणारे ताशे याच्या नादात कमालीचा फरक आहे. पूर्वी वरातीत रंग भरण्याचं खरं काम करायचा, तो ताशाच. ताशा हे वाद्य वाजवत असताना बदलले जाणारे विविध प्रकारचे ठेके वरातीमध्ये नृत्य करणाऱ्या सर्वांना बेभान होऊन नाचायला भाग पाडायचे. वरातीमध्ये ताशा वाजवता वाजवता हे वाद्य वाजवणारे कलाकारांचे पाय देखील आपोआप थिरकायला लागत. ताशा, ढोलकी, टिमकी हे सार एकत्र वाजू लागलं, की मुकेही बोलू लागतील आणि दिव्यांग ही नाचू लागतील असा याचा बाज असतो. वराती मधील ताशा या वाद्याची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. ताशा शिवाय वरात ही संकल्पनाच न पटणारी आहे. वरातीमध्ये ताशा वाजायला सुरुवात झाली, की या कलाकारांमध्ये अधिकाधिक जोश निर्माण करण्यासाठी जमिनीवर अथवा ढोलकी वर विविध मूल्यांच्या चलनी नोटा ठेवणे आणि ताशा वाजवणाऱ्या कलाकारांनी, या नोटा वाद्य वाजवत असतानाच आपल्या तोंडाने उचलणे अशी एक आगळीवेगळी स्पर्धा रंगते. कधी कधी वरातीत नृत्य करणारे आणि बेभान झालेले कलाकार देखील आपल्या मुखात विविध मूल्याच्या चलनी नोटा पकडून समोरच्याने त्या खेचून घ्याव्यात म्हणून आव्हान देत असतात. अशावेळी ज्याच्या मुखात चलनी नोटा आहेत, त्याच्या नृत्य करताना होणाऱ्या हालचाली पाहण्यासारख्या असतात. एक जण आपल्या मुखातील चलन वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, तर दुसरा ते आपल्याला कसे मिळेल? या प्रयत्नात असतो. एकंदरच वरातीतील हा प्रकार खूपच गमतीदार आणि मजेशीर असतो यात शंका नाही. 

                  पूर्वीच्या काळी वरातीमध्ये दांडपट्टा, लाठी - काठी असे साहसी खेळ देखील पहायला मिळत असत. तोंडात रॉकेल घेऊन हवेत त्याचा फवारा मारत आग पेटविण्याचा साहसी प्रकार आजही केला जात असल्याचे पहायला मिळते. वराती मधील जशी वाद्य बदलली तसे पूर्वीचे खेळ देखील लोप पावले. अर्थात पूर्वीचे हे साहसी खेळ दाखणारे कलाकार देखील कमी झाल्याने आता वराती मधून केवळ बेंजो आणि डीजे या कर्णकर्कश वाद्यावर होणारे पदन्यासच पाहायला मिळतात. या दोन वाद्यांवर केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालींना नृत्य म्हणावे का ? असा प्रश्न पडत असल्याने त्याला पदन्यास हाच शब्दप्रयोग उचित वाटतो. पूर्वी ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या वरातींना एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. ज्या घरात शुभ कार्य असेल, तेथून ही वरात ग्रामदेवतेच्या मंदिरापर्यंत नेली जायची. या मार्गादरम्यान वरातीत सहभागी असणाऱ्या सर्वांना रस्ता नीट दिसावा या उद्देशाने वरातीच्या अधेमधे डोक्यावर गॅसबत्ती घेतलेली माणसं उजेड दाखवण्याचे काम करत. वरातीचा हा काफीला रस्त्याने ग्रामदेवतेच्या मंदिराकडे निघाला, की रात्रीच्या वेळी हे दृश्य अक्षरश: नजरेचे पारणे फेडणारे असे. वरात सुरू झाल्यानंतर अन्य वेळी कधीही न थिरकणाऱ्या मंडळींची पावले ताशाचा आवाज आल्यानंतर हळूहळू प्रथम जागेवरच थिरकू लागत. ताशाच्या आवाजात जोर चढला आणि आबाल वृद्ध नृत्य करू लागले, की अन्य वेळी कशातही सहभाग न घेणारे माणसं देखील वरातीमध्ये अंगात संचार भरल्याप्रमाणे नाचू लागत. हा सारा परिणाम ताशा या वाद्यातून येणाऱ्या नादाचा आणि ठेक्याचा असे. ग्रामीण भागात एखाद्या घरात संपन्न होणारं शुभकार्य हे गावाला आपल्याच घरातील कार्य वाटे, परिणामी संपूर्ण गावाचा सहभाग या शुभ कार्यासह वरातीमध्ये देखील मिळाल्याचे दिसून येई. 

             
              ग्रामीण भागात कोणतेही शुभ कार्य असले, की मंडपामध्ये सर्वप्रथम मान मिळतो तो तासे - वाजंत्री करणाऱ्या कलाकारांना. खणखणीत आवाजाचे एक दमदार चर्मवाद्य , म्हणजे ताशा ! विविध मराठी गाण्यांमध्ये देखील ताशा या वाद्याचा उल्लेख केलेला आहे. पुरातन काळापासून या वाद्याला असलेले महत्त्व आजही कायम आहे. कोणत्याही मंगलकार्याप्रसंगी , मिरवणूक अथवा स्वागत समारंभात ताशा या वाद्याची उपस्थिती महत्त्वाची असते. ताशा वाजवणारे कलाकार पारंपारिक  पध्दतीने हे वाद्य वाजविण्याची कला शिकतात. किमान चार ताशे , दोन ढोलक्या आणि छोटे असले तरी अचूक वेळी वाजून आपल्या आवाजाने लक्ष वेधून घेणारी ' टीमकी ' असा हा वाद्यवृंद ठरून गेलाय. पूर्वी केवळ ग्रामीण भागात कडकडणारा हा ताशा सध्याच्या काळात तर, शहरातील ढोल ताशा पथकात सन्मानाचे स्थान मिळवून आहे. पुरुष वादक कलाकारांना मागे टाकून स्त्रियादेखील अप्रतिम ताशा वाजवत असल्याचे पाहायला मिळते. ताशा या चर्मवाद्याचे नाते हे मंगल कार्यक्रमाशीच जोडले गेले आहे. ताशा वाजू लागला की, तन मन आपोआप थिरकू लागते. ताशाला स्वतःच्या लयीची एक सुंदर भाषा आहे. कोणत्याही प्रांतातल्या भाषेत ताशा आपले स्थान आजही टिकवून आहे. कोकणच्या ग्रामीण भागात आजही वरात म्हटली, की ताशा हे समीकरण आजही कायम आहे. 

                    
                वाद्ये मानवी मनाला केवळ आनंद देतात असे नव्हे तर, दु:ख – नैराश्य देखील दूर करतात. मंगलसमयी वाजविण्यासाठी वाद्यांचा शोध लागला असला तरी, वाद्यांचा थेट संबध मानवी मनाशी जोडला गेला आहे. वाद्याची निर्मिती आणि ते वाजविण्यात कलाकारांनी मिळवलेलं प्रभुत्व हा साधनेचा भाग असतो. एकांतात संगीत मानवाची सोबत करते. वाद्ये मानवाचा जीवनप्रवास सुकर करतात. यासाठी संगीत आणि वाद्य यांना मानवी जीवनात मोठे स्थान आहे. संगीत हे वाद्यांशिवाय निर्माण होऊ शकत नाही. वाद्यांचे अनेक प्रकार असले तरी, प्रत्येकाचे वैशिष्टय भिन्न स्वरूपाचे आहे. चर्म वाद्य , तंतू वाद्य , फुंक वाद्य अशा वाद्य प्रकारात ताशा हा चर्म वाद्यात मोडतो. तांब्याच्या धातूपासून ताशाचे भांडे बनवले जाते. या भांड्यावर कमावलेले कातडे चढवून त्याला चाव्या लावल्या जातात. ताशा वाजविण्यापूर्वी या चाव्या घट्ट करून घेतात. वेताच्या काठ्यांचा आघात करून ताशा वाजवला जातो. विशेषतः लग्न आणि मुंज या विधींसाठी ग्रामीण भागात आजही शास्त्र म्हणून ताशा वाजविण्याची पध्दत आहे. मंगलकार्याची मानाची निमंत्रणे देण्यासाठी ताशाचे वादन लागतेच. मंगलकार्यात सकाळी घाणे भरताना ताशाचे वादन सुरू असावे लागते. ताशे वाजायला लागल्यानंतर अनेक संकेत आपोआप मिळून जातात. ताशे वाजू लागल्यानंतर उत्साही मंडळींच्या अंगात अक्षरशः संचार भरतो. ताशांचा आवाज ऐकल्यानंतर लगबग आणि हातातील कामांची गती आपोआप वाढू लागते. या वाद्याच्या वादनाची सुरुवात आणि शेवट कसा करायचा?  याचीही पध्दत ठरलेली आहे. ताशे वाजविणारे कलाकार हे सुरांकडे कान लावून असले, तरी त्यांची नजर यजमानाकडे अथवा मंडपात भिरभिरत असते. त्यांच्या नजरेतून ओळखीची माणसं सहसा सुटत नाहीत. ताशांची संख्या चार अथवा आणखी कितीही असली तरीही मुख्य वाजपी ठरलेला असतो. त्यानेच सुरुवात आणि शेवट करायचा, हा या वाजप्यांचा अलिखित नियम असतो. चाल बदलणे , आवाजातील चढ उतार आणि शेवटाकडे येणे हे मुख्य वाजप्यावरच अवलंबून असते.       

             
               आपल्या वाद्यांवर वादकांचे कमालीचे प्रेम असते. त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असल्याचे पहायला मिळते. ताशांच्या भोवती छान झालर लावून या वाद्याला सजवले जाते. ताशांची भांडी स्वच्छ ठेवणे, आघात करण्यासाठीच्या काठ्या रेखीव आणि वळणदार असणे याकडे वादकांचे बारीक लक्ष असते. ताशांच्या संचात सर्वांचे लक्ष वेधून घेते ती, आकाराने छोटी असलेली ' टीमकी '. हे वाद्य छोटे असले तरी त्याचे नाव आणि कीर्ती जगन्मान्य आहे. ताशाबरोबर ढोलकी वाजत असते. मात्र ज्यावेळी ढोलकी क्षणाचा विश्राम घेते त्यावेळी टीमकी आपली मर्दुमकी गाजवते. टीमकीचा हा आवाज सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावरूनच एखादी व्यक्ती सतत आपली प्रौढी मिरवत असेल तर, त्याला स्वतःची ' टीमकी ' वाजविणे असे म्हटले जाते. ताशे वाजविणाऱ्या मंडळींची कला पाहून त्यांना उपस्थितांकडून बक्षिसे देखील दिली जातात. काही उत्साही मंडळींना ताशे वाजविण्याची लहर येते, त्यांना मधील मोकळ्या वेळात अशी संधी ताशेवाल्यांकडून दिली जाते. मंगलकार्यात वरात हा सर्वाधिक आनंदाचा सोहळा असतो. वरात परत घरात येईपर्यंत लागणारा कालावधी हा अनिश्चित मानला जातो. वरातीमध्ये घरातील लहान थोर सारीच मंडळी जसं जमेल तसं नाचून स्वतःचे समाधान करून घेतात. मात्र वरातीत रंगत आणण्याची सारी जबाबदारी असते ती, वाद्यांवर म्हणजेच ताशांवर. ठेका बदलत जसा ताशा कडकडत जातो तशी नाचायला रंग भरत जातो. वरातीत ताशेवाल्यांनी विविध पध्दतीने ठेका घ्यावा यासाठी ताशेवाल्यांना बक्षीस देऊन खूष करण्याची चढाओढ लागते. यात ताशेवाले , ढोलकीवाले देखील आपोआप थिरकायला लागतात. मंगलकार्यात तरुणाई वाट पाहात असते ती वरातीचीच. या तीन चार तासांच्या कार्यक्रमात ताशेवाल्यांच्या वाद्य कौशल्याची कसोटी लागते आणि ते यात पूर्णपणे यशस्वी होतात. वरातीत ताशेवाले अक्षरशः घामाघूम होतात. वरात परत घरात येऊन विसावल्यानंतरच ताशेवाल्यांना विराम मिळतो. थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीचे भोजन होते आणि मगच ताशेवाल्यांना निरोप दिला जातो. ठरलेली बिदागी, मानाचा विडा आणि श्रीफळ देऊन ताशेवाजंत्र्यांना हसतमुखाने निरोप दिला जातो. 
                        

                    काळ बदलला आणि वाद्याचे नवनवीन प्रकार आले. चर्मवाद्यांची जागा आधुनिक इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी घेतली. मंगलकार्य आणि मिरवणुकीत आता अग्रस्थानी बेंजोसारखे कानठळ्या बसवणारे वाद्य दाखल झाले. असे असले तरी या आधुनिक वाद्यांना ताशा – ढोलकी आणि टीमकीची सर कशी येणार ? आधुनिक वाद्यातून नाद बाहेर पडत असला तरी, तो श्रवणीय असेलच असे नाही. बेंजोचे प्रमाण वाढत असले, तरीही ग्रामीण भागातून आजही ताशांचे महत्व कायम आहे हे विशेष. ताशा कडाडू लागल्यानंतर तन मन या नादात उल्हसित होते. पुरातन काळापासून या वाद्याने समाजाच्या मनावर गाजवलेले अधिपत्य आजही कायम आहे. सध्याच्या काळात शहरातूनही ढोल ताशांची नवनवीन पथके तयार होत आहेत. विशेष म्हणजे या पथकातून तासे वाजविण्यासाठी तरुणी पुढे येत आहेत ही आनंदाची बाब मानली पाहिजे. ग्रामीण भागात शुभकार्याप्रसंगी मानाची निमंत्रणे देण्यासाठी आजही ताशा हे वाद्य सोबत असावे लागते. याबरोबरच शुभकार्यात मंडपात पहिला मान मिळतो, तो ताशेवाल्यांनाच. माझ्या आठवणी तशा दोन-तीन वराती कायमच्या घर करून आहेत. यात पहिली  म्हणजे, बालपणी शाळेत जाण्याचा असणारा आळस, कायमचा दूर करण्यासाठी आईने हातात काठी घेऊन पूर्ण वाडीतून मला सर्वांसमक्ष झोडत नेत काढलेली वरात. दुसरी म्हणजे आमचे स्नेही मकरंद मुळये यांच्या विवाह प्रसंगी काढलेली वरात. या वारातीमध्ये स्त्री आणि पुरुष आपलं वय आणि देहभान विसरून अगदी मनसोक्त नाचले होते. आमचं तन मन देखील त्यावेळी आमच्या ताब्यात राहिलं नव्हतं. ही वरात कधीही न विसरता येण्यासारखी ठरली. त्यानंतर आमचा पुतण्या अथर्व याच्या व्रतबंधा निमित्त काढण्यात आलेली भिक्षावळ मिरवणूक, वरात. या वरातीत देखील आलेले सर्व आप्तेष्ट, स्नेही ताशांच्या साथीने अगदी मनसोक्त, मनमुराद आणि मन भरेपर्यंत नाचले होते. या तीन वराती मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. 

                वरातीवरूनच एक किस्सा आठवला. काही प्रतिष्ठित मंडळी विवाहानंतर काढल्या जाणाऱ्या वरातीच्या गप्पा मारत एकत्र बसले होते. प्रत्येक जण या वरातीमधील आपापले अनुभव अगदी रंगतदारपणे कथन करत होता. आपल्या विवाहानंतर काढल्या गेलेल्या वरातीमध्ये कशी मजा आली होती, हे सांगण्याची प्रत्येकात जणू चढा ओढच लागली होती म्हणा ना ! विवाहानंतर वरात काढणे हा काही वेळा एक प्रतिष्ठेचा भाग देखील समजला जातो. वरातीमध्ये कसा झगमगाट होता, किती फटाके वाजवले गेले, कशी आतशबाजी झाली, किती प्रकारची वाद्य होती, वधू-वरांची गाडी कशी सजवली होती, किती पैसे उडवले गेले याची देखील खूप मोठी चर्चा होते. ग्रामीण भागात अथवा गावात पुढे काही दिवस या वरातीबाबतची चर्चा चांगलीच रंगत जाते. अशा प्रकारच्या चर्चेमुळे गावातील हे विवाह अथवा अन्य शुभकार्य आगळी वेगळी ठरतात आणि अनेकांच्या कायमची लक्षात राहतात. आपल्या विवाह नंतरच्या वराती मधील चर्चा चांगल्याच रंगात आलेल्या असताना, एका प्रतिष्ठिताने आपला रंजक अनुभव कथन केला आणि तो ऐकून सर्वांनीच त्याच्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेला साष्टांग दंडवत घातला. ती व्यक्ती सांगू लागली, माझा विवाह ठरला. हळूहळू सारी तयारी पूर्ण झाली. पूर्वीच्या काळी विवाह असो अथवा कोणतेही शुभ कार्य त्याचे एक बजेट ठरलेले असे. माझ्या विवाहात सारं काही ठरलं, मात्र वरातीचा खर्च करायचा की पत्नीला एक सोन्याचा हार ? याबाबत माझ्या मनात चलबीचल निर्माण झाली. त्यावेळी हातात मोजकाच पैसा होता. 

                  अखेरीस माझ्या मनाने जो कौल दिला त्याप्रमाणे मी वागायचे ठरवले. आपला विवाह झाला हे प्रथम संपूर्ण गावाला आणि त्यानंतरच्या आगळ्यावेगळ्या आणि शाही वराती मधून अन्य सर्वांना कळलं पाहिजे. आपल्या विवाहात जशी वरात निघेल, तशी परत काही वर्षात निघणार नाही असा थाटमाट उडवून द्यायचा, असा मी माझ्या मनाची पक्का निर्धार केला. विवाहापूर्वीच्या बोलण्यात पत्नीला दागिना करतो, असे जरी मी बोललो असलो तरी तो निर्णय तूर्तास रद्द करून या दागिन्याचा सर्व खर्च विवाह नंतरच्या वरातीवर करायचा आणि संपूर्ण गावाला आपल्या विवाहाची वरात लक्षात राहील असाच थाटमाट उडवून द्यायचा या निर्णयाशी मी ठाम राहिलो. विवाह झाला सायंकाळच्या वेळी रथ सजवून, ढोल, ताशे – वाजंत्री, विविध प्रकारची पारंपारिक नृत्य, फटाक्यांची आतिषबाजी अशी शाही वरात गावातून निघाली आणि सारी माणसं अक्षरशः टकामका बघायला लागली. हे सारं दृश्य पाहून माझं मन कमालीचा तृप्त झालं. मात्र गळ्यात एक दागिना कमी असल्याची खंत पत्नीच्या मनात राहू नये यासाठी, या वरातीच्या झगमगटाटा मागील सत्य मी पत्नीला सांगायचे ठरवले. वरात दणक्यात सुरू असतानाच मी पत्नीला म्हणालो, विवाहात तुला एक सोन्याचा दागिना मी करतो, असा शब्द दिला होता खरा मात्र तो खर्च आज मी या वरातीतील झगमगटावर केला आहे. याचं कारण म्हणजे, तुला दागिना मी परत कधीही करू शकतो, मात्र आपल्या विवाहाची वरात मात्र आज एकदाच निघणार, नंतर ती काढता येणार नाही. म्हणून मी दागिन्या ऐवजी हा पैसा वरातीवर खर्च करायचा असं ठरवलं. या प्रतिष्ठिताने आपल्या विवाह नंतरच्या वरातीमधील जो किस्सा सांगितला, तो ऐकून उपस्थित मित्रांनी त्याला अक्षरशः साक्षात दंडवत घातला. वराती मधील प्रथा- परंपरा आणि असे किस्से या सोहळ्याचे महत्व आजही ठिकवून ठेवत आहेत.