वरात

◾वरात!!
              वरात ! हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येते, ती विवाह झाल्यानंतर नवरदेवाची काढली जाणारी मिरवणूक. यालाच वरात असे म्हटले जाते. फार पूर्वीपासून विवाह नंतर नवरदेवाची वरात काढण्याची प्रथा सुरू आहे. सध्याच्या काळात त्याचे रूप काहीसे बदलले असले, तरी त्या मागची भावना मात्र आजही कायम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या वरातीचं स्थान वेगवेगळं आहे. याबरोबरच प्रत्येकाच्या वरातीबाबतच्या आठवणी देखील अविस्मरणीय अशाच आहेत. वरात ही विवाहनंतर नवरदेवाचे काढली जाते, हे जरी खरं असलं तरी कोकणात व्रतबंध म्हणजेच मुंज या विधीनंतर देखील बटूची भिक्षावळ म्हणजे एक प्रकारची वराती सारखीच मिरवणूक काढण्याची पद्धत आजही सुरू आहे. एकंदरीत वरात ही का काढली जात असेल, अथवा त्यामागील खरा उद्देश काय असेल ? याबाबत विचार केला असता, शुभ कार्यानंतर परमेश्वराच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावणे आणि आनंद व्यक्त करणे अशी वरात काढण्या मागची खरी कारणं आहेत. पूर्वी ताशा या पारंपारिक वाद्याच्या तालावरच वरात काढली जात असे. आता मात्र कर्णकर्कश आवाजाच्या डीजे, बेंजो सारख्या वाद्याच्या तालावर वेळेचे भान न ठेवता वरातीचा कार्यक्रम संपन्न होताना दिसतो. पूर्वी वरात म्हणजे शुभ कार्यानंतर संपन्न होणारी एक प्रथा - परंपरा होती. बदलत्या काळात वरात म्हणजे एक इव्हेंट झाला आहे. वरात ही विवाहानंतर वधू वराची काढली जात असली, तरी व्रतबंध, गावातील एखाद्या सार्वजनिक कार्यात मिळालेलं यश, अटीतटीच्या निवडणुकीनंतर मिळालेला विजय, राज्य राष्ट्रीय स्तरावर एखाद्या व्यक्तीला मिळालेलं यश अशाप्रसंगी काढली जाणारी आनंददायी मिरवणूक देखील गावची वरात म्हणूनच ओळखली जाते. वाद्य वाजवणारे वाजपी, गावातील प्रतिष्ठित माणसं, उत्सव मूर्ती, वराती मध्ये सहभागी असणाऱ्यांना आपल्या डोक्यावर गॅसबत्ती घेऊन उजेड दाखविणारे वाटाडे, फटाक्यांची आतिषबाजी करणारे कारागीर, नृत्य करणारे तरुण-तरुणी, उतार वयातही नृत्याचा आनंद लुटणारे आजी आजोबा, वरातीच्या प्रारंभीच उड्या मारणारी छोटी छोटी मुले असा सर्व समूह एकत्रित रित्या आनंद साजरा करीत मार्गक्रमण करत असतो, त्यालाच ‘ वरात ’ असे म्हटले गेले आहे. वराती मधील प्रत्येकाच्या आठवणी जरी भिन्न असल्या, तरी त्या आजही हृदयात घर करून आहेत.

                  वरात आणि ताशा यांचं एक अतूट असं नातं आहे. पूर्वीचे ताशे आणि सध्या उपलब्ध असणारे ताशे याच्या नादात कमालीचा फरक आहे. पूर्वी वरातीत रंग भरण्याचं खरं काम करायचा, तो ताशाच. ताशा हे वाद्य वाजवत असताना बदलले जाणारे विविध प्रकारचे ठेके वरातीमध्ये नृत्य करणाऱ्या सर्वांना बेभान होऊन नाचायला भाग पाडायचे. वरातीमध्ये ताशा वाजवता वाजवता हे वाद्य वाजवणारे कलाकारांचे पाय देखील आपोआप थिरकायला लागत. ताशा, ढोलकी, टिमकी हे सार एकत्र वाजू लागलं, की मुकेही बोलू लागतील आणि दिव्यांग ही नाचू लागतील असा याचा बाज असतो. वराती मधील ताशा या वाद्याची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. ताशा शिवाय वरात ही संकल्पनाच न पटणारी आहे. वरातीमध्ये ताशा वाजायला सुरुवात झाली, की या कलाकारांमध्ये अधिकाधिक जोश निर्माण करण्यासाठी जमिनीवर अथवा ढोलकी वर विविध मूल्यांच्या चलनी नोटा ठेवणे आणि ताशा वाजवणाऱ्या कलाकारांनी, या नोटा वाद्य वाजवत असतानाच आपल्या तोंडाने उचलणे अशी एक आगळीवेगळी स्पर्धा रंगते. कधी कधी वरातीत नृत्य करणारे आणि बेभान झालेले कलाकार देखील आपल्या मुखात विविध मूल्याच्या चलनी नोटा पकडून समोरच्याने त्या खेचून घ्याव्यात म्हणून आव्हान देत असतात. अशावेळी ज्याच्या मुखात चलनी नोटा आहेत, त्याच्या नृत्य करताना होणाऱ्या हालचाली पाहण्यासारख्या असतात. एक जण आपल्या मुखातील चलन वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, तर दुसरा ते आपल्याला कसे मिळेल? या प्रयत्नात असतो. एकंदरच वरातीतील हा प्रकार खूपच गमतीदार आणि मजेशीर असतो यात शंका नाही. 

                  पूर्वीच्या काळी वरातीमध्ये दांडपट्टा, लाठी - काठी असे साहसी खेळ देखील पहायला मिळत असत. तोंडात रॉकेल घेऊन हवेत त्याचा फवारा मारत आग पेटविण्याचा साहसी प्रकार आजही केला जात असल्याचे पहायला मिळते. वराती मधील जशी वाद्य बदलली तसे पूर्वीचे खेळ देखील लोप पावले. अर्थात पूर्वीचे हे साहसी खेळ दाखणारे कलाकार देखील कमी झाल्याने आता वराती मधून केवळ बेंजो आणि डीजे या कर्णकर्कश वाद्यावर होणारे पदन्यासच पाहायला मिळतात. या दोन वाद्यांवर केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालींना नृत्य म्हणावे का ? असा प्रश्न पडत असल्याने त्याला पदन्यास हाच शब्दप्रयोग उचित वाटतो. पूर्वी ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या वरातींना एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. ज्या घरात शुभ कार्य असेल, तेथून ही वरात ग्रामदेवतेच्या मंदिरापर्यंत नेली जायची. या मार्गादरम्यान वरातीत सहभागी असणाऱ्या सर्वांना रस्ता नीट दिसावा या उद्देशाने वरातीच्या अधेमधे डोक्यावर गॅसबत्ती घेतलेली माणसं उजेड दाखवण्याचे काम करत. वरातीचा हा काफीला रस्त्याने ग्रामदेवतेच्या मंदिराकडे निघाला, की रात्रीच्या वेळी हे दृश्य अक्षरश: नजरेचे पारणे फेडणारे असे. वरात सुरू झाल्यानंतर अन्य वेळी कधीही न थिरकणाऱ्या मंडळींची पावले ताशाचा आवाज आल्यानंतर हळूहळू प्रथम जागेवरच थिरकू लागत. ताशाच्या आवाजात जोर चढला आणि आबाल वृद्ध नृत्य करू लागले, की अन्य वेळी कशातही सहभाग न घेणारे माणसं देखील वरातीमध्ये अंगात संचार भरल्याप्रमाणे नाचू लागत. हा सारा परिणाम ताशा या वाद्यातून येणाऱ्या नादाचा आणि ठेक्याचा असे. ग्रामीण भागात एखाद्या घरात संपन्न होणारं शुभकार्य हे गावाला आपल्याच घरातील कार्य वाटे, परिणामी संपूर्ण गावाचा सहभाग या शुभ कार्यासह वरातीमध्ये देखील मिळाल्याचे दिसून येई. 

             
              ग्रामीण भागात कोणतेही शुभ कार्य असले, की मंडपामध्ये सर्वप्रथम मान मिळतो तो तासे - वाजंत्री करणाऱ्या कलाकारांना. खणखणीत आवाजाचे एक दमदार चर्मवाद्य , म्हणजे ताशा ! विविध मराठी गाण्यांमध्ये देखील ताशा या वाद्याचा उल्लेख केलेला आहे. पुरातन काळापासून या वाद्याला असलेले महत्त्व आजही कायम आहे. कोणत्याही मंगलकार्याप्रसंगी , मिरवणूक अथवा स्वागत समारंभात ताशा या वाद्याची उपस्थिती महत्त्वाची असते. ताशा वाजवणारे कलाकार पारंपारिक  पध्दतीने हे वाद्य वाजविण्याची कला शिकतात. किमान चार ताशे , दोन ढोलक्या आणि छोटे असले तरी अचूक वेळी वाजून आपल्या आवाजाने लक्ष वेधून घेणारी ' टीमकी ' असा हा वाद्यवृंद ठरून गेलाय. पूर्वी केवळ ग्रामीण भागात कडकडणारा हा ताशा सध्याच्या काळात तर, शहरातील ढोल ताशा पथकात सन्मानाचे स्थान मिळवून आहे. पुरुष वादक कलाकारांना मागे टाकून स्त्रियादेखील अप्रतिम ताशा वाजवत असल्याचे पाहायला मिळते. ताशा या चर्मवाद्याचे नाते हे मंगल कार्यक्रमाशीच जोडले गेले आहे. ताशा वाजू लागला की, तन मन आपोआप थिरकू लागते. ताशाला स्वतःच्या लयीची एक सुंदर भाषा आहे. कोणत्याही प्रांतातल्या भाषेत ताशा आपले स्थान आजही टिकवून आहे. कोकणच्या ग्रामीण भागात आजही वरात म्हटली, की ताशा हे समीकरण आजही कायम आहे. 

                    
                वाद्ये मानवी मनाला केवळ आनंद देतात असे नव्हे तर, दु:ख – नैराश्य देखील दूर करतात. मंगलसमयी वाजविण्यासाठी वाद्यांचा शोध लागला असला तरी, वाद्यांचा थेट संबध मानवी मनाशी जोडला गेला आहे. वाद्याची निर्मिती आणि ते वाजविण्यात कलाकारांनी मिळवलेलं प्रभुत्व हा साधनेचा भाग असतो. एकांतात संगीत मानवाची सोबत करते. वाद्ये मानवाचा जीवनप्रवास सुकर करतात. यासाठी संगीत आणि वाद्य यांना मानवी जीवनात मोठे स्थान आहे. संगीत हे वाद्यांशिवाय निर्माण होऊ शकत नाही. वाद्यांचे अनेक प्रकार असले तरी, प्रत्येकाचे वैशिष्टय भिन्न स्वरूपाचे आहे. चर्म वाद्य , तंतू वाद्य , फुंक वाद्य अशा वाद्य प्रकारात ताशा हा चर्म वाद्यात मोडतो. तांब्याच्या धातूपासून ताशाचे भांडे बनवले जाते. या भांड्यावर कमावलेले कातडे चढवून त्याला चाव्या लावल्या जातात. ताशा वाजविण्यापूर्वी या चाव्या घट्ट करून घेतात. वेताच्या काठ्यांचा आघात करून ताशा वाजवला जातो. विशेषतः लग्न आणि मुंज या विधींसाठी ग्रामीण भागात आजही शास्त्र म्हणून ताशा वाजविण्याची पध्दत आहे. मंगलकार्याची मानाची निमंत्रणे देण्यासाठी ताशाचे वादन लागतेच. मंगलकार्यात सकाळी घाणे भरताना ताशाचे वादन सुरू असावे लागते. ताशे वाजायला लागल्यानंतर अनेक संकेत आपोआप मिळून जातात. ताशे वाजू लागल्यानंतर उत्साही मंडळींच्या अंगात अक्षरशः संचार भरतो. ताशांचा आवाज ऐकल्यानंतर लगबग आणि हातातील कामांची गती आपोआप वाढू लागते. या वाद्याच्या वादनाची सुरुवात आणि शेवट कसा करायचा?  याचीही पध्दत ठरलेली आहे. ताशे वाजविणारे कलाकार हे सुरांकडे कान लावून असले, तरी त्यांची नजर यजमानाकडे अथवा मंडपात भिरभिरत असते. त्यांच्या नजरेतून ओळखीची माणसं सहसा सुटत नाहीत. ताशांची संख्या चार अथवा आणखी कितीही असली तरीही मुख्य वाजपी ठरलेला असतो. त्यानेच सुरुवात आणि शेवट करायचा, हा या वाजप्यांचा अलिखित नियम असतो. चाल बदलणे , आवाजातील चढ उतार आणि शेवटाकडे येणे हे मुख्य वाजप्यावरच अवलंबून असते.       

             
               आपल्या वाद्यांवर वादकांचे कमालीचे प्रेम असते. त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असल्याचे पहायला मिळते. ताशांच्या भोवती छान झालर लावून या वाद्याला सजवले जाते. ताशांची भांडी स्वच्छ ठेवणे, आघात करण्यासाठीच्या काठ्या रेखीव आणि वळणदार असणे याकडे वादकांचे बारीक लक्ष असते. ताशांच्या संचात सर्वांचे लक्ष वेधून घेते ती, आकाराने छोटी असलेली ' टीमकी '. हे वाद्य छोटे असले तरी त्याचे नाव आणि कीर्ती जगन्मान्य आहे. ताशाबरोबर ढोलकी वाजत असते. मात्र ज्यावेळी ढोलकी क्षणाचा विश्राम घेते त्यावेळी टीमकी आपली मर्दुमकी गाजवते. टीमकीचा हा आवाज सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. यावरूनच एखादी व्यक्ती सतत आपली प्रौढी मिरवत असेल तर, त्याला स्वतःची ' टीमकी ' वाजविणे असे म्हटले जाते. ताशे वाजविणाऱ्या मंडळींची कला पाहून त्यांना उपस्थितांकडून बक्षिसे देखील दिली जातात. काही उत्साही मंडळींना ताशे वाजविण्याची लहर येते, त्यांना मधील मोकळ्या वेळात अशी संधी ताशेवाल्यांकडून दिली जाते. मंगलकार्यात वरात हा सर्वाधिक आनंदाचा सोहळा असतो. वरात परत घरात येईपर्यंत लागणारा कालावधी हा अनिश्चित मानला जातो. वरातीमध्ये घरातील लहान थोर सारीच मंडळी जसं जमेल तसं नाचून स्वतःचे समाधान करून घेतात. मात्र वरातीत रंगत आणण्याची सारी जबाबदारी असते ती, वाद्यांवर म्हणजेच ताशांवर. ठेका बदलत जसा ताशा कडकडत जातो तशी नाचायला रंग भरत जातो. वरातीत ताशेवाल्यांनी विविध पध्दतीने ठेका घ्यावा यासाठी ताशेवाल्यांना बक्षीस देऊन खूष करण्याची चढाओढ लागते. यात ताशेवाले , ढोलकीवाले देखील आपोआप थिरकायला लागतात. मंगलकार्यात तरुणाई वाट पाहात असते ती वरातीचीच. या तीन चार तासांच्या कार्यक्रमात ताशेवाल्यांच्या वाद्य कौशल्याची कसोटी लागते आणि ते यात पूर्णपणे यशस्वी होतात. वरातीत ताशेवाले अक्षरशः घामाघूम होतात. वरात परत घरात येऊन विसावल्यानंतरच ताशेवाल्यांना विराम मिळतो. थोडी विश्रांती घेतल्यानंतर रात्रीचे भोजन होते आणि मगच ताशेवाल्यांना निरोप दिला जातो. ठरलेली बिदागी, मानाचा विडा आणि श्रीफळ देऊन ताशेवाजंत्र्यांना हसतमुखाने निरोप दिला जातो. 
                        

                    काळ बदलला आणि वाद्याचे नवनवीन प्रकार आले. चर्मवाद्यांची जागा आधुनिक इलेक्ट्रॉनिक वाद्यांनी घेतली. मंगलकार्य आणि मिरवणुकीत आता अग्रस्थानी बेंजोसारखे कानठळ्या बसवणारे वाद्य दाखल झाले. असे असले तरी या आधुनिक वाद्यांना ताशा – ढोलकी आणि टीमकीची सर कशी येणार ? आधुनिक वाद्यातून नाद बाहेर पडत असला तरी, तो श्रवणीय असेलच असे नाही. बेंजोचे प्रमाण वाढत असले, तरीही ग्रामीण भागातून आजही ताशांचे महत्व कायम आहे हे विशेष. ताशा कडाडू लागल्यानंतर तन मन या नादात उल्हसित होते. पुरातन काळापासून या वाद्याने समाजाच्या मनावर गाजवलेले अधिपत्य आजही कायम आहे. सध्याच्या काळात शहरातूनही ढोल ताशांची नवनवीन पथके तयार होत आहेत. विशेष म्हणजे या पथकातून तासे वाजविण्यासाठी तरुणी पुढे येत आहेत ही आनंदाची बाब मानली पाहिजे. ग्रामीण भागात शुभकार्याप्रसंगी मानाची निमंत्रणे देण्यासाठी आजही ताशा हे वाद्य सोबत असावे लागते. याबरोबरच शुभकार्यात मंडपात पहिला मान मिळतो, तो ताशेवाल्यांनाच. माझ्या आठवणी तशा दोन-तीन वराती कायमच्या घर करून आहेत. यात पहिली  म्हणजे, बालपणी शाळेत जाण्याचा असणारा आळस, कायमचा दूर करण्यासाठी आईने हातात काठी घेऊन पूर्ण वाडीतून मला सर्वांसमक्ष झोडत नेत काढलेली वरात. दुसरी म्हणजे आमचे स्नेही मकरंद मुळये यांच्या विवाह प्रसंगी काढलेली वरात. या वारातीमध्ये स्त्री आणि पुरुष आपलं वय आणि देहभान विसरून अगदी मनसोक्त नाचले होते. आमचं तन मन देखील त्यावेळी आमच्या ताब्यात राहिलं नव्हतं. ही वरात कधीही न विसरता येण्यासारखी ठरली. त्यानंतर आमचा पुतण्या अथर्व याच्या व्रतबंधा निमित्त काढण्यात आलेली भिक्षावळ मिरवणूक, वरात. या वरातीत देखील आलेले सर्व आप्तेष्ट, स्नेही ताशांच्या साथीने अगदी मनसोक्त, मनमुराद आणि मन भरेपर्यंत नाचले होते. या तीन वराती मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. 

                वरातीवरूनच एक किस्सा आठवला. काही प्रतिष्ठित मंडळी विवाहानंतर काढल्या जाणाऱ्या वरातीच्या गप्पा मारत एकत्र बसले होते. प्रत्येक जण या वरातीमधील आपापले अनुभव अगदी रंगतदारपणे कथन करत होता. आपल्या विवाहानंतर काढल्या गेलेल्या वरातीमध्ये कशी मजा आली होती, हे सांगण्याची प्रत्येकात जणू चढा ओढच लागली होती म्हणा ना ! विवाहानंतर वरात काढणे हा काही वेळा एक प्रतिष्ठेचा भाग देखील समजला जातो. वरातीमध्ये कसा झगमगाट होता, किती फटाके वाजवले गेले, कशी आतशबाजी झाली, किती प्रकारची वाद्य होती, वधू-वरांची गाडी कशी सजवली होती, किती पैसे उडवले गेले याची देखील खूप मोठी चर्चा होते. ग्रामीण भागात अथवा गावात पुढे काही दिवस या वरातीबाबतची चर्चा चांगलीच रंगत जाते. अशा प्रकारच्या चर्चेमुळे गावातील हे विवाह अथवा अन्य शुभकार्य आगळी वेगळी ठरतात आणि अनेकांच्या कायमची लक्षात राहतात. आपल्या विवाह नंतरच्या वराती मधील चर्चा चांगल्याच रंगात आलेल्या असताना, एका प्रतिष्ठिताने आपला रंजक अनुभव कथन केला आणि तो ऐकून सर्वांनीच त्याच्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेला साष्टांग दंडवत घातला. ती व्यक्ती सांगू लागली, माझा विवाह ठरला. हळूहळू सारी तयारी पूर्ण झाली. पूर्वीच्या काळी विवाह असो अथवा कोणतेही शुभ कार्य त्याचे एक बजेट ठरलेले असे. माझ्या विवाहात सारं काही ठरलं, मात्र वरातीचा खर्च करायचा की पत्नीला एक सोन्याचा हार ? याबाबत माझ्या मनात चलबीचल निर्माण झाली. त्यावेळी हातात मोजकाच पैसा होता. 

                  अखेरीस माझ्या मनाने जो कौल दिला त्याप्रमाणे मी वागायचे ठरवले. आपला विवाह झाला हे प्रथम संपूर्ण गावाला आणि त्यानंतरच्या आगळ्यावेगळ्या आणि शाही वराती मधून अन्य सर्वांना कळलं पाहिजे. आपल्या विवाहात जशी वरात निघेल, तशी परत काही वर्षात निघणार नाही असा थाटमाट उडवून द्यायचा, असा मी माझ्या मनाची पक्का निर्धार केला. विवाहापूर्वीच्या बोलण्यात पत्नीला दागिना करतो, असे जरी मी बोललो असलो तरी तो निर्णय तूर्तास रद्द करून या दागिन्याचा सर्व खर्च विवाह नंतरच्या वरातीवर करायचा आणि संपूर्ण गावाला आपल्या विवाहाची वरात लक्षात राहील असाच थाटमाट उडवून द्यायचा या निर्णयाशी मी ठाम राहिलो. विवाह झाला सायंकाळच्या वेळी रथ सजवून, ढोल, ताशे – वाजंत्री, विविध प्रकारची पारंपारिक नृत्य, फटाक्यांची आतिषबाजी अशी शाही वरात गावातून निघाली आणि सारी माणसं अक्षरशः टकामका बघायला लागली. हे सारं दृश्य पाहून माझं मन कमालीचा तृप्त झालं. मात्र गळ्यात एक दागिना कमी असल्याची खंत पत्नीच्या मनात राहू नये यासाठी, या वरातीच्या झगमगटाटा मागील सत्य मी पत्नीला सांगायचे ठरवले. वरात दणक्यात सुरू असतानाच मी पत्नीला म्हणालो, विवाहात तुला एक सोन्याचा दागिना मी करतो, असा शब्द दिला होता खरा मात्र तो खर्च आज मी या वरातीतील झगमगटावर केला आहे. याचं कारण म्हणजे, तुला दागिना मी परत कधीही करू शकतो, मात्र आपल्या विवाहाची वरात मात्र आज एकदाच निघणार, नंतर ती काढता येणार नाही. म्हणून मी दागिन्या ऐवजी हा पैसा वरातीवर खर्च करायचा असं ठरवलं. या प्रतिष्ठिताने आपल्या विवाह नंतरच्या वरातीमधील जो किस्सा सांगितला, तो ऐकून उपस्थित मित्रांनी त्याला अक्षरशः साक्षात दंडवत घातला. वराती मधील प्रथा- परंपरा आणि असे किस्से या सोहळ्याचे महत्व आजही ठिकवून ठेवत आहेत. 

No comments:

Post a Comment