#कोकण #बालपण #आठवणी
कोकणात फणस खूप प्रमाणात येतात. फळ मोठं घरात किती खाणार, आम्ही फणसाचा सिझन सुरू झाला म्हणजे एप्रिल मे महिन्यात वाट बघायचो फणस कधी पिकतो आहे याची. फणसाचे दोन प्रकार असतात, जास्त करून सर्वाना माहीत असलेला म्हणजे "कापा" फणस. याला हे नाव का पडलं असेल तर तो कापून खावा लागतो. आणि दुसरा "बरका" याला हे नाव का असेल हे मला अजून नाही कळलं. पण हा हाताने फोडून खायचा फणस. याचे गरे एकदम रसाळ, आणि मऊ असतात. हे बरके गरे खाण्याचं एक टेक्निक असतं. अख्खा गरा तोंडात टाकायचा आणि त्यातली बी (आठिळ) तोंडातच वेगळी करून गर खायचा(गिळायचा हा शब्द जास्त योग्य आहे कारण हा चावायला लागत नाही)
हा पण फणस खाल्ला की वर अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही. नाहीतर पोट दुखणं नक्की. मला हा बरका फणस जास्त आवडतो. आम्ही सकाळी मऊ भात खाऊन झाला की त्यानंतर हा फणस खाण्याचा कार्यक्रम करत असू. आमच्या घरी शेजारच्या काकांची छोटी मुलगी येत असे, बाबांच्या जवळ तिचे फार पटे. बाबा तिला सांगत.. *आज आमच्या कडे जॅकफ्रुट पार्टी आहे तू ये हं*
पहिला फणस गावात ज्यांच्या कडे पिकेल तो आवर्जून शेजारी पाजारी दिला जाई.
आता खूप प्रमाणात फणस आले की ते कच्चे असताना पण आत चांगला जून गरा तयार झाला म्हणजे फणसाच्या सालीवर जे काटे असतात ते सुरुवातीला जवळ जवळ असतात फणस तयार झाला की ते रुंद होतात हे फणस जून झाला असल्याचं ओळखण्यासाठी खूण. तर असे जून फणस काढून त्यातले गरे काढून चिरून तळणे हा एक वेळखाऊ आणि किचकट कार्यक्रम असे. आता सगळीकडे तळलेले गरे मिळतात. जॅकफ्रूट चिप्स. ते खोबरेल तेलात तळले की स्वाद छान येतो.
तर एक दिवस हा घरोघरी सवडीने केला जाणारा उद्योग. फार किचकट पण खायला अप्रतिम. हाताला तेल लावून हा फणस निवडावा लागतो. त्यातले गरे वेगळे करून त्यातल्या आठीळा काढून तो पातळ उभे काप करून चिरावा लागतो. गरम तेलात छान कुरकुरती होई पर्यंत मिठाचं पाणी घालून तळायचा हे फार वेळखाऊ काम आहे. पण फायनल प्रॉडक्ट् साठी हे सगळे कष्ट करायची तयारी असायची आमची. कोकणात दमट हवा त्यात पाऊस, हे तळलेले गरे तसेच कुरकुरीत ठेवणं हा ही एक टास्क असे. त्यामुळे डब्याच झाकण कुणाला न कळत उघडण शक्य होत नसे. एवढं ते घट्ट लावलेलं असे. हे तळलेले गरे हे देखील बाहेर पाऊस पडत असताना पाऊस बघत बघत खायची मजा भारी असते.
आज थांबते...