*"श्री मकर संक्रांतीचे महत्व व पूजेची माहिती".....*
*"मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे".*
यावर्षी दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांत, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे.
*संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-*
फार वर्षापुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेश करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ समजला जातो.
या तीन दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत. सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण. वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
*मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-*
जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.
*भोगी :-*
*दि. १४/०१/२०१९ रोजी सोमवार...*
पौष शुक्ल पक्ष अष्टमी ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी अजुन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.
*श्री सुर्य संक्रमण :-*
शके १९४० पौष शु. ८ ला रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे.
*मकर संक्रांत :-*
*मकर संक्रांती माहिती :-*
पर्वकाळ पौष शु ९ ला दिनांक १५/०१/२०१९ मंगळवार सकाळी सुर्यदय ०७:१४ मी पासुन ते सुर्यास्त संध्याकाळी ०६:२० मी पर्यत आहे.
*संक्रांती फल :-*
संक्रात वाहन सिंह, उपवाहन हत्ती आहे.
पांढरे रंगाचे वस्ञ परिधान केले आहे. हातात भृशुंडी शस्त्र
घेतलेले आहे. कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे. वयाने बाल आहे. वासाकरिता चाफ्याचे फुले घेतले आहे. देव जाति आहे. अन्न भक्षण करते आहे. भुषणार्थ प्रवाळ रत्ने धारण केले आहे. वार नांव व नक्षञ नांव ध्वाक्षी आहे. प्रवास दक्षिणे कडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे.
*पुजा साहित्य :-*
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.
पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे. वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात. जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात *“तीळ-गुळ घ्या गोड गोड बोला”* तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्ट्रात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी *कीक्रांत* असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले काम करू नये.
*किंक्रांत :-*
दि १६/० १/२०१९ रोजी बुधवार.
पौष कृष्ण दशमी हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी अजुन किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात.
*यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे.*
इ. स. १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक यांची आहे.
त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १५ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सुर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो.
मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थाने वापरत असतो. दिनमान वाढत जाणे, त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे.
*हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.*
*संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व :-*
*या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.*
*संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।*
*तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।*
( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.
*मेष -*
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.
*वृषभ -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.
*मिथुन -*
या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.
*कर्क -*
या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.
*सिंह -*
या राशीचा स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक रत्न, गहू, लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, चंदन दान करावे.
*कन्या -*
या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.
*तूळ -*
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.
*वृश्चिक -*
या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ , खिचडी, धान्य दान करावे.
*धनु -*
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभ-याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.
*मकर -*
या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांनी तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.
*कुंभ -*
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.
*मीन -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.
*सुचना :-*
दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात...ही संक्रांत अशुभ आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार कधीच नसतो. त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
*ज्योतिषरत्न :-*
*डॉ. सुधाकर कुडू,*
No comments:
Post a Comment