आई बाबा

लग्ना नंतर खरच मुल ही बायको साठी आई बापाला वार्यावर सोडतात ??

जड झालेले आई-बाप*

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा 'राजेशचा' मला फोन आला... म्हणाला, "मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!"
मी "हो थांबतो" म्हटलं.
मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.
एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, "ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल...!"
ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..
अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, "आजोबा तुम्हाला भूक लागलीय? हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!"
ते म्हणाले, "नको बाबा नको.. पैसे नको.. एक वडापाव घेऊन दे तेवढा"
मी म्हटलं, "थांबा इथेच मी घेऊन येतो."
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले, "वर नको बसू , पडशील... इथं बस माझ्या बाजूला, कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !"
मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली... कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? वैगेरे वैगरे.
"मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे...
इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,  वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.
पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!"
मी म्हणालो, "बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही, सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, "परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं... फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा...त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून"
आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली... मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं...
मी विचारलं, "तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?"
"मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त" ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला...
मग मी तो कागद उघडून पाहिला... *त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.*
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता... मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं.
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश...
आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो...
मला कळत नव्हतं, मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल..
आजोबांना मी म्हणालो, "आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.
अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं, "मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये? "
ते म्हणाले, "मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी...
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो....
तेवढ्यात मित्राचा आवाज आला, "चल ना ऐ...!"
आणि मी भानावर आलो... त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो...
घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता...
*'आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस.. आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता...? इतकं प्रेम????'*

No comments:

Post a Comment