Bappa cha nirop alay

बाप्पाचा निरोप********
काल स्वप्नात आला बाप्पा
म्हणाला,
हल्ली पृथ्विवर यावेसे वाटत नाही,
आणि आल्याशिवाय रहावतही नाही
स्पिकरच्या भिंती पाहून छातीत भरते धडकी,
सूपाएवढ्या कानांनी कर्णकर्कश गाणी ऐकण्याची शिक्शा नाही थोडीथेडकी!
पण अथर्वशिर्षाची आवर्तने,आरत्यांचा ताल आणि बाप्पा मोर्याच्या गजरापासून दूर रहावत नाही
म्हणून म्हणतो,
हल्ली पृथ्विवर यावेसे वाटत नाही
आणि आल्याशिवाय रहावतही नाही
आयटम सॉंगवरचा नंगानाच बघून माझीपण जाम सटकते,
हे प्रकार करून सांगा मला कुठली संस्कृती टीकते?
पण,लेझिमचा ठेका आणि ढोल पथकाची शान अनुभवण्याचा मोह सोडवत नाही
म्हणून म्हणतो,
हल्ली पृथ्विवर यावेसे वाटत नाही
आणि आल्याशिवाय रहावतही नाही
निघण्याआधी आई म्हणाली
कशासाठी जातोस पृथ्विवर?
दहा दिवस जपतात तुला प्राणापलिकडे,
आणि विसर्जनानंतरचे तुझे हाल बघायला वेळ असतो का कोणाकडे?
आईला म्हणालो,
मूठभर मूर्खांमुळे,जिवापाड प्रेम करणार्या लेकरांचा विरस मी करू शकत नाही
म्हणूनच म्हणतो,
हल्ली पृथ्विवर यावेसे वाटत नाही
पण आल्याशिवाय रहावतही नाही
कालच येताना भेटलेे टिळक
म्हणाले बाप्पा मला माफ कर
गणेशोत्स्वाचे केवढे बदलले स्वरुप
पवित्रता हरवून आले ओंगळवाणे रूप.
टिळकांना म्हणालो
आहेत अजून थोडी डोकी
तुमचा वारसा जपणारी
त्यांना निराश करून चालणार नाही
म्हणूनच म्हणतो
हल्ली पृथ्विवर यावेसे वाटत नाही
पण,आल्याशिवाय रहावतही नाही
मी तर आहे निर्गुण निराकार
मग कशाला हवा हा भपकेपणाचा बाजार?
मोठमोठ्या मूर्तींसाठी तुमची असते स्पर्धा,
घरी पोहचेपर्यंत माझा जीव होतो अर्धा!
प्रत्येक गल्लीबोळात असंख्य गणपतिंची स्थापना,
त्यापेक्शा छान आहे 'एक गाव एक गणपति'ची संकल्पना
लवकर शहाणे व्हा
नाहीतर खरच पृथ्विवर यायची माझी इच्छा रहाणार नाही.

No comments:

Post a Comment