👉 _*चेंगराचेंगरी; निष्काळजीपणाचे 22 बळी!*_
_*Lets Up Special Report*_
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर आज मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. जखमींचा आकडा जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
👉 _*एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?*_
आज सकाळी 9.30 च्या सुमारास अचानक पाऊस आला. पावसापासून बचाव व्हावा यासाठी परळ आणि एलफिन्स्टनला जोडणाऱ्या ब्रिजवर बरेच प्रवासी उभे होते. त्यातच परळ आणि एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी गाड्या आल्या. या दोन्ही स्टेशनचे प्रवासी एकदम आल्याने आणि ब्रिजवर उभ्या असलेल्या लोकांना बाहेर पाऊस असल्याने उतरायचे नसल्याने ब्रिज माणसांनी गच्च भरला होता.
त्याचवेळी पत्रा कोसळल्याचे सांगण्यात आले. गर्दीच्यावेळी मोठा आवाज झाल्याने गैरसमजातून धावपळ सुरु झाली. ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले. एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली. यातच काही महिला आणि इतर प्रवासी खाली पडले. त्यांना अडकून आणखी काही प्रवासी ब्रिजवर पडले त्यांच्या अंगावरून लोकं गेल्याने ही चेंगराचेंगरी झाली. ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर काढावे लागले.
मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. कारण या चेंगराचेंगरीने 22 पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला होता. या चेंगराचेंगरीत अनेक महिलांचे कपडे फाटले, अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला होता. महिलांचा आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसले ते अत्यंत भयानक होते. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर या रहिवाशांनी त्यांना चहा, पाणी आणि प्राथमिक औषधोपचार केला.
👉 _*’ही’ परिस्थिती का उद्भवली?*_
एल्फिन्स्टन स्टेशन हे पश्चिम रेल्वे मार्गावर आहे. परळ, वरळी यांना जोडणारे हे स्टेशन आहे. परळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर सकाळच्या वेळी कायमच प्रवाशांची गर्दी असते. अनेक ऑफिस या भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरदार या भागात लोकलने येतात. गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या वाढलेली आहे, मात्र ब्रिजची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने काहीच प्रयत्न झालेले नाहीत. अरुंद ब्रिजमुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात होत असतात. लोक त्याविरोधात ओरड करतातही परंतू प्रशासन त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाही.
एक मात्र झाले प्रवाशांनी मुलभूत सुविधांची मागणी केली आणि राजकीय पक्षांनी स्टेशनचे नाव बदलण्याची. आणि ते कागदोपत्री बदललेही गेले. कागदोपत्री एल्फिन्सटन स्टेशनचे नाव हे प्रभादेवी स्टेशन आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत ब्रिजची क्षमता कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळी पुलावर ताण वाढतो. याकडे राज्यकर्त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. त्याकडे प्रशासनाकडून लक्ष न दिले गेल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
👉 _*उच्चस्तरीय चौकशी होणार*_
मुंबईतील एल्फिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. तसेच घटनेतील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जखमींची प्रकृती सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
👉 _*मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक*_
देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.
👉 _*कोणाला किती मदत?*_
1) मृतांच्या वारसांना : राज्य सरकारकडून 5 लाख + रेल्वेकडून 5 लाख = 10 लाख
2) गंभीर जखमी : 1 लाख
3) किरकोळ जखमी : 50 हजार
4) जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार
No comments:
Post a Comment