*'माझं कोकण' *
आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.
दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
माणसं बदलली आणि कोकण बदलत चाललंय.
तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही. पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.
*'कोकण'* म्हणजे कौलारू घर,
स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.
*'कोकण'* म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.
*'कोकण'* म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.
*'कोकण'* म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला आईचा चेहरा.
*'कोकण'* म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, रत्नेश्वर.
*'कोकण'* म्हणजे कौलारू देवळे, देवळा शेजारून वाहणारी छोटी नदी.
*'कोकण'* म्हणजे गर्द देवराई,
त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.
*'कोकण'* म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारी देवीची पालखी, तीला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.
*'कोकण'* म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई
*'कोकण'* म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.
*'कोकण'* म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.
*'कोकण'* म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.
*'कोकण'* म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या अठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.
*'कोकण'* म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटण घातलेली उसळ.
*'कोकण'* म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.
*'कोकण'* म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.
*'कोकण'* म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.
*'कोकण'* म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.
No comments:
Post a Comment