लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


















लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - [Lokmanya Bal Gangadhar Tilak] मातीतले कोहिनूर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.
 
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.
यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
टिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी’ व ‘जहालमतवादी’ असे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९१६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अ‍ॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.
इंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’? असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.
लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी ‘गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.
लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.
लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. सन १९२० जुलैत त्यांना हिवतापानं घेरलं. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरु होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेची येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.
१ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारतमातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. हां हां म्हणता ही घटना सर्व मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते.
ज्या ठिकाणी मुंबईतील हजारो लोक रोज सकाळ संध्याका्ळ चौपाटीवर फेरफटका मारायला जातात, त्याच ठिकाणी सरकारी परवानगींने लोकमान्य टिळकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व लोकांना चौपाटीवर आल्यानंतर नित्यशः कै. लो. टिळकांचे दर्शन रोज मिळत असतं. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढारीही होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यादिवशी पं. जवाहरलाल नेहरू ही मुंबईत होते. त्यांनाही ही दुःखद घटना कळल्यावर अतिशय दुःख झालं. ते म्हणाले “भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला. यापुढे देशाची सर्वांनाच चिंता वाटणार आहे, तरीसुद्धा जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकलेले नाही. आपण सर्वांनी हे दुःख विसरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडत रहाणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल”.


#लोकमान्य बाळ गंगाधर टिळक #lokamanya Tilak #Bal Gangadhar Tilak #History of India

No comments:

Post a Comment