गेली १५ - २० वर्ष ज्या गोष्टी आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून सांगतो आहोत, ते या चित्रपटात उत्तमपणे मांडले आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व, समाजाची मराठी शाळांबद्दलची उदासिनता, शिक्षण खात्याचा एकूण कारभार, जबरदस्तीने मराठी शाळांच्या पाडकामामागील बिल्डर लॉबीचा वरचष्मा आणि माजी विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळांबद्दलचे योगदान या गोष्टींचे चित्रपटात प्रभावी चित्रण आलं आहे.
'एक मराठी शाळा वाचविण्यामागील माजी विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न' ही या चित्रपटाची एका ओळीतली कथा जी प्रेक्षकांपर्यंत अचूक पोचते. सोबतीला अनेक उपकथा आहेत. सुमन आक्काचं माहेरी न जाणं, पॅटीस खाण्यामागची गोष्ट, सलमाचं अनाथपण, बाळू मामाचं भूत, अंजली दीपची प्रेमकथा इत्यादी. मूळ कथेच्या ओघात त्या त्या वेळी या उपकथा येतात आणि मूळ कथेत विरून जातात. म्हणजे धूमकेतू येतात नी निघून जातात तसं. त्यामुळे मूळ कथेला बाधा पोचत नाही. किंबहुना त्यामुळे चित्रपट अधिक रंजकच होतो. अनेक कलाकारांच्या गोतावळ्यात असलेल्या चित्रपटावर लेखक, दिग्दर्शकाची असलेली पकडच यातून दिसते.
'स्वर्गात आकाशगंगा' या गाण्याने शाळेतल्या जुन्या आठवणींना दिलेली उजळणी तर 'हाकामारी' या गाण्यातला लोकसंगीताचा बाज त्या त्या वेळी लक्षणीय वाटतो. 'शाळा मराठी माझी शाळा मराठी वं' हे लोकप्रिय झालेलं गाणं सुरुवातीला ऐकलं तेव्हा ते चित्रपटात कुठे, कसं आलं असेल याचा अंदाज येत नव्हता. पण चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा प्लेबॅक म्हणून केलेला वापर आणि त्याचवेळी पडद्यावरील चित्रण मार्मिक आहे.
चित्रपट संपल्यावर नेहमीप्रमाणे नुसती श्रेयनामावली दाखवली असती तरी चाललं असतं कारण चित्रपटातून नेमकं काय म्हणायचं आहे ते तोवर प्रेक्षकांना कळलं होतंच. पण तरीही नावे दाखवताना जी कल्पकता दाखवली आहे त्यामुळे कथेच्या गाभ्याला उच्चप्रतीचे नैतिक अधिष्ठान मिळालं आहे जे खूपच आश्वासक आणि अभिनंदनीय आहे!
आणि हो, शेवटी मराठी शाळा वाचणार हे जरी आपल्याला माहित असलं तरी ज्या सकारात्मक आणि आश्वासक टप्प्यावर चित्रपटाचा शेवट केला आहे, ती खरी सुरुवात म्हणता येईल. या चित्रपटाने अशी सुरुवात महाराष्ट्रात झाली तरी या चित्रपट निर्मितीचा हेतू साध्य झाला असंच म्हणता येईल.
सगळ्याच कलाकारांनी समरसून कामं केली आहेत. सचिन खेडेकरांनी साकारलेले मुख्याध्यापक दिनकर शिर्के गुरुजी, अमेय वाघचा बबन म्हात्रे, सिध्दार्थ चांदेकरचा सेलिब्रेटी दीप, अनंत जोग यांचा जगताप बिल्डर, क्षिती जोग यांनी साकारलेली सलमा, कादंबरी कदमची सुमन आक्का, पुष्कराज चिरपुटकरचा विशू, हरीष दुधाडेचा राकेश घरत, शिक्षणमंत्री झालेले जितेंद्र जोशी या सर्वांनीच आपआपला अ दर्जा टिकवून ठेवला आहेच. पण प्राजक्ता कोळीने साकारलेली अंजली पदार्पणातच लक्ष वेधून घेते. संवाद फेकीचे तिचे टायमिंग उत्तम आहे. बाळू मामांची एकूणच घालमेल धनंजय सरदेशपांडेंनी छान व्यक्त केलीय तर प्रिंसुली आणि पापुली या बापलेकांचा खट्याळपणा उत्तम मनोरंजन करतो. पॅटीसवाल्याच्या भूमिकेतले उदय सबनीस दोनच प्रसंगात दिसतात पण लक्षात राहतात. अंजलीच्या आईच्या भूमिकेतल्या चिन्मयी सुमीत यांना या चित्रपटात थोडी अधिकची भूमिका हवी होती असा मराठी शाळांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा रास्त आग्रह असला तरी मिळालेल्या भूमिकेत चिन्मयी ताईंनी चाळीस चांद लावलेत, हे मात्र नक्की!
चित्रपटाचे संवाद ही या चित्रपटाची भक्कम बाजू. मराठी शाळांचा मुद्दा हा भावनिक वाटला तरी त्याला व्यवहाराची आणि खेळीमेळीची उत्तम जोड संवादातून दिली आहे. त्याला राजकारणाचा गंध लागणार नाही याची जशी काळजी घेतलीय तसंच वाक्यं प्रचारकी नी कंटाळवाणी होणार नाहीत याचेही भान संवादातून जपले आहे. छापखाना आणि कारखाना, मराठी भाषा शिकायची नाहीच आणि पुढच्या पिढ्यांना शिकवायचीही नाही, शिक्षक पगारी आणि शिक्षण बाजारू झालंय, शाळेचा निरोप समारंभ, मी ही तेव्हा लहानच होते हे सलमाचे वाक्य अशा छोट्या छोट्या वाक्यांमधून विषयाची पेरणी केली आहे. शिर्के गुरुजींनी शिक्षणमंत्र्यांसमोर केलेलं दीर्घ निवेदन सोडले तर चित्रपटात कुठेही लांबपल्ल्याची वाक्ये नाहीत. संपूर्ण चित्रपट संवादी होत राहतो. समुद्राच्या पाण्यात उमटलेली 'मधली सुट्टी' ही अक्षरं विषय आणि शब्दांना फारच हळुवारपणे सादर केल्याची साक्ष आहेत.
चित्रपटाचे छायाचित्रण सुरेख तर आहेच पण चित्रीकरणाच्या जागा अप्रतिम आहेत. डोंगराच्या कडेने रस्त्याने जाणारी गाडी आणी त्याला समांतर समुद्र किनारा हे परदेशातील नयनरम्य स्थळीच पहायला मिळणारं दृष्य खोखरी किल्ल्याकडे शाळेची सहल जाताना आपल्या मुरुड जंजिरा याच्या जवळपासचं आहे याचे पडद्यावरील चित्रण नितांत सुंदर आहे. सर्वात प्रभावी छायाचित्रण वाटलं ते समुद्राकडे चालत जाताना वाळूत उमटलेली पावलं आणि समुद्राच्या पाण्यात पाय रोवून उभी असलेली सलमा! दिग्दर्शक आणि छायाचित्रणकाराला कडकडीत सलाम!
एकूण छान आहे चित्रपट. हे झालं एक प्रेक्षक म्हणून.
मराठी शाळांच्या चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणूनही काही गोष्टी नोंदवाव्यात असं वाटतं.
'सरकार प्रश्न सोडविण्यासाठी असतं, आम्हालाच उलट प्रश्न विचारण्यासाठी नाही' हे सडेतोड वाक्य, नावच शिक्षण 'खातं' आहे, हे या खात्याचा भोंगळ कारभार दाखवणारं चित्रण आणि चित्रपटातील शिक्षणमंत्र्यांचा वावर. सद्यस्थिती पाहता चित्रपटाला कुठलाही राजकीय रंग येणार नाही याची घेतलेली काळजी दिसत असली तरी चित्रपटात राजकीय भाष्य आहे, आकडेवारी आहे, ही चांगली बाजू आहे. मात्र त्या आकडेवारीचा विशेषत: मुलींच्या शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम हा ही कुठेतरी अधोरेखीत व्हायला हवा होता.
राजेंद्र दर्डा, विनोद तावडे, वर्षा गायकवाड, दीपक केसरकर आणि दादा भुसे हे गेल्या वीस-पंचवीस वर्षातील महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री. यात दर्डांशी खुलेपणाने भांडता तरी येत होतं. पण बाकीच्यांपर्यंत मराठी शाळांचा मुद्दा पोहोचवणंसुध्दा किती जिकीरीचे आहे हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांनाच ठावूक. मात्र एका सेलिब्रेटीचे रिल व्हायरल झाल्याने आणि त्याची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामु़ळे स्वत: शिक्षणमंत्री हा विषय सोडविण्यासाठी पुढाकार घेतात हे चित्रपटात दाखवलेलं चित्रण म्हणजे फारच अवास्तव वाटतं. किंबहुना मराठी शाळांच्या जबरदस्तीच्या पाडकामाविरोधात खूपच सोपा मार्ग उपलब्ध आहे असा निष्कर्ष त्यातून निघू शकतो, जो वास्तवाला धरून अजिबातच नाहीय. यासाठी चित्रपटकर्त्यांनी चळवळीतल्या लोकांशी बोलून थोडा अधिक वास्तवदर्शी मार्ग काढता आला असता.
दुसरा मुद्दा मराठी शाळा का हवी याच्या चित्रपटातल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पहिल्याच चर्चेचा. त्या चर्चेत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगण्यात कमतरता जाणवली. अकरावी नंतर सुरुवातीचे काही महिने त्रास झाला तरी मराठीतून शिकल्यामुळे इंग्रजीत आपण कुठेही कमी पडलो नाही हा भाग चर्चेत आहेच. पण मराठी शाळांमध्ये शिकून नेमका काय फायदा झाला ते त्या चर्चेत येत नाही. ती चर्चा मध्येच तोडल्यासारखी वाटते. अर्थात ही उणीव नंतरच्या अनेक प्रसंगांमधून भरून काढल्याचे जाणवते. उदाहरणार्थ चांगलं मराठी बोलणारा नट मिळणं, परदेशात उच्चपदावर नोकरी मिळणं, दुबई-बॅकॉकमध्ये हॉटेल काढणारा व्यावसायिक मिळणं, आपल्या बोलीवर प्रेम करणारा आणि तरीही यशस्वी कंत्राटदार मिळणं, अनाथ मुस्लिम मुलीचं शासनातील उच्चाधिकारी होणं, यशस्वी शेती करण्यासोबत वकीली करणं ही सगळी उदाहरणे मराठी शाळेत शिकूनही होतात, किंबहुना मराठी शाळेत शिकल्यामुळे यांचं कुठेही अडलं नाही, हे ठसठशीतपणे आपल्यासमोर येत राहतं.
नार्वेकर बाई या सर्व माजी विद्यार्थ्यांना सुरुवातीला आग्रह करतात की तुमची मराठी शाळा वाचविण्यासाठी शिर्के गुरुजींना तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावीच लागेल. आणि हे सर्व माजी विद्यार्थी ती शाळा नेटाने वाचवितातही. तेव्हा याच नार्वेकर बाई शिर्के गुरुजींना सांगतात की आता शाळा पाडली तरी काही हरकत नाही, या मुलांमुळे ती अजरामर झाली! या म्हणण्यामागचं काही लॉजीकच कळत नाही. मग आग्रह धरला तो फक्त अजरामर होण्यासाठीच का, असा प्रश्न पडतो.
अर्थात चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काही उणीवा जाणवल्या तरी एक मराठी चित्रपट म्हणून, त्यातही मराठी शाळांवरचा चित्रपट म्हणून आणि एक सुजाण व सजग पालक म्हणून तर प्रत्येकाने आवर्जून पहा, असा आग्रह जरूर आहे.
शाळेत असताना फुकट पॅटीस खाल्लेल्या पॅटीसवाल्या काकांना त्याचे पैसे परत करताना विशू म्हणतो की मुद्दलच परत करतो आहे, व्याज कधीही फेडू शकणार नाही! या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी शाळेचे ऋण फेडण्याचा फक्त प्रयत्नच केला आहे, त्या शाळेने घडविलेल्या माणूसपणाचे व्याज कधीही न फेडता येण्यासारखंच आहे, असंच या चित्रपटातील हरेकाला म्हणावंसं वाटत असणार, हे मात्र नक्की!
आनंद भंडारे, १९ जानेवारी २०२६
No comments:
Post a Comment